news
clock
सह्याद्री पर्वतरांगांमधील ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यात आढळले दुर्मिळ फुलपाखरु ....'ऑटम लीफ'

सह्याद्री पर्वतरांगांमधील ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यात आढळले दुर्मिळ फुलपाखरु ....'ऑटम लीफ'

सह्याद्री पर्वतरांगांमधील ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यात आढळले दुर्मिळ फुलपाखरु ....'ऑटम लीफ' 

पुणे, ता. १२ -  'ऑटम लीफ' हे दुर्मिळ फुलपाखरु सह्याद्री पर्वतरांगांमधील ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यात आढळून आले आहे. पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील भागात किंवा हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारे हे दुर्मिळ फुलपाखरु प्रथमच ताम्हिणीच्या परिसरात आढळून आल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. 

बटरफ्लाय ऑफ पुणे ग्रुपचे सदस्य पवन दामुर, अनिरुद्ध जोशी, आदित्य क्षीरसागर व दत्तात्रेय लांघी यांना हे फुलपाखरु नुकतेच आढळले आहे. अनिरुद्ध जोशी यांनी त्याची छायाचित्रे काढली. मंदार निंबर्गी यांनी फुलपाखराची ओळख पटवली. लांघी म्हणाले, "ताम्हिणीचे जंगल हे अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. इथे अनेक दुर्मिळ जीव दिसून येतात. शिवाय अनेक प्रकारच्या वनस्पती, कबुतरांच्या जाती, विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे व रानफुले आढळतात. रविवारी (ता. ८) या जंगल सफारीमध्ये काही पर्यावरण प्रेमींना 'ऑटम लीफ' या जातीच्या फुलपाखराचे दर्शन झाले. याला मराठीत 'शुष्कपर्ण' किंवा 'शरद ऋतूतील पान' असेही संबोधले जाते."

'ऑटम लीफ' ही 'निम्फालिडे' कुळातील एक प्रजाती आहे. ती आपल्या अविश्वसनीय छद्मावरणासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा या फुलपाखराचे पंख मिटलेले असतात, तेव्हा ते एखाद्या वाळलेल्या तपकिरी पानासारखे दिसते. याचा रंग जंगलातील झाडांच्या जमिनीवर गळलेल्या वाळलेल्या पालापाचोळ्यात सहजपणे मिसळून जाते. यामुळे भक्षकांपासून वाचण्यास मदत होते. थोड्याफार फरकाने 'सह्याद्री ब्लू ओकलीफ' सारखे दिसणाऱ्या, परंतु पंख पसरवताच फरक दिसणारे हे फुलपाखरु अतिशय दुर्मिळ समजले जाते. ऑटम लिफ हे गर्द लालसर तपकिरी रंगाचे असते. दोघांच्याही पंखावरील कडा व टोके काळसर दिसतात. ही फुलपाखरे सामान्यतः प्राथमिक आणि दुय्यम वर्षावनांमध्ये राहतात. शिवाय शहरी भागात आणि दलदलीच्या वनात देखील आढळून येतात. पुणे जिल्ह्यात हे फुलपाखरु पहिल्यांदाच आढळून आले आहे, असे लांघी यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories