दूषित पाण्यामुळे होणाऱ्या नदीप्रदूषणाच्या प्रश्नावर माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांचे उपोषण
दूषित पाण्यामुळे होणाऱ्या नदीप्रदूषणाच्या प्रश्नावर माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांचे उपोषण
पिंपरी, ता. १५ - सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते दूषित पाणी थेट पवना नदीत मिसळत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि हा प्रश्न तत्काळ सोडवावा या मागणीसाठी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे सोमवारपासून (ता. १३) किवळे येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला नागरीकांकडून तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. ही केवळ पर्यावरणाची समस्या नसून सार्वजनिक आरोग्याचा आपत्कालीन प्रश्न बनला आहे. दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असूनही प्रशासन निष्क्रिय आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. प्रशासनाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवून, कोणतेही अशुद्ध पाणी नदीत जाणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
राहुल काटे, सुरेश रानवडे, शांताराम भोंडवे, दत्तात्रय भोंडवे यांच्यासह अनेक नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, सामाजित कार्यकर्ते सागर शिंदे यांनी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्या पत्रात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांचे वाढते प्रदूषण ही अत्यंत गंभीर बाब असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. शिवसेना नेते व खासदार श्रीरंग बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख गटनेते विश्वजीत बारणे आणि नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे सागर शिंदे यांनी म्हटले आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. नदी प्रदूषणाविरोधात लढा देत असलेले माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास सागर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.