जर्मनीतील विठ्ठल धाम मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा
जर्मनीतील विठ्ठल धाम मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा
पुणे, ता. २१ - महाराष्ट्रासाठी एक गौरवाचा प्रसंग आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी (ता. १९) जर्मनीतील रेमबोल्डशॉसर स्ट्रासे किर्चहम येथील विठ्ठल धाम मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आळंदी आणि देहू संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा "ज्ञानोबा-तुकाराम" या जयघोषात नि टाळ-मृदंगाच्या गजरात पार पडला. या सोहळ्यासाठी भारतातून ३५ वारकरी गेले होते. जर्मनीतील स्थानिक मराठी व जर्मन नागरिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आळंदी देहू येथून गुरुवारी (ता. १६) जर्मनीतील विठ्ठल धाम मंदिराकडे रवाना झाल्या. तेथे दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शनिवारी (ता. १८) सकाळी काकड आरतीने सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजता दिंडीचे आयोजन केले होते.
दिवसाची सांगता ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित "नमो ज्ञानेश्वरा" या इंग्रजीमधून सादर झालेल्या कार्यक्रमाने झाली. रविवारी (ता. १९) सकाळी ७.३० वाजल्यापासून दोन्ही संतांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला प्रारंभ झाला. या निमित्ताने आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांचे इंग्रजीतून कीर्तन झाले. आळंदी संस्थानच्या फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमास डॉ. भावार्थ देखणे, देहू संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सुनील महाराज मोरे स्वामी समर्थ प्रतिष्ठान औंधचे श्रीकांत पाटील उपस्थित होते.
जर्मनीत विठ्ठल धाम मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केल्याबद्दल संत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी देवस्थानचे कौतुक केले आहे. ''अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दोन्ही संतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. जागतिक प्रचार प्रचारासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. यासाठी आळंदी आणि देहू देवस्थाने या मूर्ती भेट स्वरुपात दिल्या. महाराष्ट्रातील सरकारने वारकऱ्यांसाठी पालखी मार्गाची निर्मिती केली. हरितवारी निर्मलवारी अशा अनेक उपक्रम राबवते. आता जागतिक पातळी सुद्धा आमच्या वारकरी संतांचा गौरव होत आहे, हा निश्चितच अभिमानास्पद क्षण आहे. त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार मानतो." अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.