वाकडमध्ये जनकल्याण शिबिर; 8500 हून अधिक नागरिकांना लाभ!

वाकडमध्ये जनकल्याण शिबिर; 8500 हून अधिक नागरिकांना लाभ!

वाकड | २९ सप्टेंबर २०२६ : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. वाकड येथे नगरसेवक राहुल कलाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयातर्फे आयोजित लाभार्थी शिबिराला चव्हाण यांनी उपस्थिती लावली. यावेळी विविध शासकीय योजना आणि सुविधांचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरण तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राहुल कलाटे यांनी तंत्रज्ञान आणि संवाद यंत्रणेचा मेळ घालून राबविलेल्या ‘जनकल्याण शिबिर’ उपक्रमाचे चव्हाण यांनी कौतुक केले.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत सोसायटी, गावठाण आणि वस्ती भागात ६४ हून अधिक शिबिरे आयोजित करण्यात आली असून त्यातून ८,५०० हून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

“सरकार योजना बनवते; मात्र त्या यशस्वीपणे लोकांपर्यंत घेऊन जाणे हे लोकप्रतिनिधींचे काम असते. योजनेचा केवळ प्रचार न करता तिची संपूर्ण अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे,” असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

राहुल कलाटे यांनी नागरिकांच्या दारापर्यंत जनसंपर्क कार्यालयाच्या सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने जनकल्याण शिबिरे सुरू केल्याचे सांगितले. या माध्यमातून कोणतेही सेवा शुल्क न घेता पात्र नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आणि सदस्यांच्या वतीने रवींद्र चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. आमदार शंकरशेठ जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, गटनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक रेश्मा भुजबळ, कुणाल वाव्हळकर, धर्मपाल तंतरपाळे यांच्यासह पदाधिकारी, लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories