पिंपरी-चिंचवड | २९ सप्टेंबर २०२६ : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करून नुकसान करणाऱ्या टोळीचा मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २४२ किलो तांब्याच्या तारांसह एक पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार असा एकूण १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे तांब्याच्या तारांच्या चोरीचे चार गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपी आणि रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत होते.
तांब्याच्या तारांची चोरी करून हा माल विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने २६ सप्टेंबर रोजी देहूरोड फूड प्लाझा येथे पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा कारमधून तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी मोहम्मद तय्यब मोहम्मद शफी शाह (वय २८), मैनुद्दीन खलील शाह (वय ३५) आणि सुफियान जमीरउल्ला खान (वय १९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २४२ किलो तांब्याच्या तारांसह इर्टिगा कार असा १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींकडून दक्षिण चाकण पोलीस ठाण्यातील एक आणि उत्तर चाकण पोलीस ठाण्यातील तीन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. या चारही गुन्ह्यांमधील चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.