मॅफेड्रोन पावडर बाळगणाऱ्या तरुणाला वाकडमधून अटक
पिंपरी, ता. २६ - वाकड येथील कस्पटे चौकाजवळ पोलिसांनी २७ हजार ४०० रुपयांची मॅफेड्रोन पावडर एका ३५ वर्षीय तरुणाकडून सोमवारी (ता. २५) जप्त केली आहे. या तरुणावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कमलेश भगवान ससाणे (वय ३५ वर्षे, रा. बाणेर) याने कस्पटे चौक परिसरात २७,४००/- रुपये किंमतीची ५.४८ ग्रॅम मॅफेड्रोन पावडर बाळगली होती. या अंमली पदार्थासह प्लॅस्टिक पिशव्या, चमचा व एक मोबाईल फोन असा एकूण ३७ हजार ४००/- रुपयांचा माल त्याच्याकडे सापडला आहे. ही पावडर त्याने विक्रीसाठी बेकायदेशीरपणे बाळगली होती. आरोपी जवळचा माल जप्त करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीवर वाकड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २५) एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.