राज्यातील धरणांमध्ये यंदा मार्चमध्ये ६४.४१ टक्के पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती
Mar 06 2026
51
राज्यातील धरणांमध्ये यंदा मार्चमध्ये ६४.४१ टक्के पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती
पुणे, ता. ६ - राज्यातील धरणांमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा मार्चच्या सुरवातीलाच तीन हजारांहून अधिक ६४.४१ टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हा साठा ५७.२२ टक्के होता. यंदाचा साठा ७.१९ टक्क्यांनी अधिक आहे. यामध्ये, सर्वाधिक पाणीसाठा हा पुणे विभागात असून, सर्वात कमी साठा कोकण विभागात आहे.
नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या सहा विभागांत तीन हजार ११ धरणे असून, त्यामध्ये मोठे प्रकल्प १३८, मध्य प्रकल्प २६२ आणि लघू प्रकल्प दोन हजार ६११ आहेत.
राज्यात गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर मोठा राहिल्याने मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणे उन्हाळ्यातच पूर्ण भरली होती. धरणांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने पाणी नद्यांमधून सोडावे लागले, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पिकांचेही नुकसान झाले होते.
गेल्या वर्षीच्या मुसळधार व अतिमुसळधार पावसामुळे यंदा मार्च महिन्यात सर्वच धरणांमधील पाण्याचा साठा चांगला आहे. दुष्काळग्रस्त असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणांमध्ये सुद्धा पाण्याची स्थिती खूपच चांगली आहे. पाण्याचा नियोजनपूर्वक वापर केला तर पावसाळ्याच्या दिवसांपर्यंत पाणी पुरेल, असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.