लाडकी बहिण योजनेतील शासनाने अपात्र ठरवलेल्या पात्र महिलांना पुन्हा लाभ द्यावा, असंख्य भगिनींची मागणी
लाडकी बहिण योजनेतील शासनाने अपात्र ठरवलेल्या पात्र महिलांना पुन्हा लाभ द्यावा, असंख्य भगिनींची मागणी
कष्टकरी कामगार महासंघाच्या नेतृत्वाखाली महिलांचे निगडी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पिंपरी, ता. ६ - लाडकी बहिण योजनेतील असंख्य लाभार्थी गरजू भगिनी विविध कारणांनी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी कष्टकरी कामगार महासंघाच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी निगडी येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ५) धरणे आंदोलन केले. मागण्याचे फलक हाती घेऊन महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कष्टकरी कामगार महासंघाचे काशिनाथ नखाते म्हणाले, ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना आर्थिक आधार देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, आज राज्यातील तब्बल ८० लाखांहून अधिक महिलांना विविध कारणांनी अपात्र ठरवण्यात आले आहे. सर्व्हर डाऊन, ओटीपी न मिळणे, केवायसीतील तांत्रिक अडचणी आणि प्रशासनातील त्रुटींमुळे अनेक कष्टकरी, कामगार, विधवा, परित्यक्ता व निराधार महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत. ज्यांना खऱ्या अर्थाने या योजनेची गरज आहे, त्यांनाच योजनाबाहेर ठेवण्याचा प्रकार अत्यंत अन्यायकारक आहे.''
''शासनाने अपात्र ठरवलेल्या पात्र महिलांना पुन्हा संधी द्यावी, विशेष मोहीम राबवून त्यांना लाभ मिळवून द्यावा. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दरमहा रुपये २१०० अर्थसहाय्य द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. लोककल्याणकारी योजना या राजकारणासाठी नव्हे तर गरजूंच्या सक्षमीकरणासाठी असतात, याची जाणीव शासनाने ठेवावी. प्रत्येक पात्र महिलेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील.'' अशी भूमिका महिलांनी व्यक्त केली.
प्रमुख मागण्या -
१) तांत्रिक अडचणींमुळे अपात्र ठरवेल्या महिलांना केवायसी करण्याची योग्य संधी द्यावी.
२) आर्थिक बोजाच्या कारणास्तव लाभार्थी महिलांची संख्या कमी न करता कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची सरकराने हमी द्यावी.
३) निवडणूकीत जाहीर केल्याप्रमाणे २१०० रुपये लाभ द्यावा.
४) कष्टकरी, कामगार, विधवा, परित्यक्ता, निराधार, आसाह्य महिलांसाठी विशेष अभियान राबवून त्यांना पात्र करावे.
५) योजनेतून अपात्र ठरवलेल्या महिलांची जिल्हानिहाय कारणांची यादी सादर करुन त्यातील पात्र महिलांना पुन्हा संधी द्यावी.