देशाच्या विकासात श्रमिकांचे योगदान मोलाचे - कामगार नेते यशवंत भोसले
पिंपरी, ता. २ - ''श्रमिकांचे कष्ट, त्याग आणि संघर्ष यामुळेच भारत देशाचा विकास झाला असून त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. इतिहासात सर्वांत मोठे बलिदान हे श्रमिकांचेच दिसून येईल'' असे गौरवोद्गार कामगार नेते व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी काढले.
कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने संत तुकाराम नगर, पिंपरी येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कामगार नेते यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त हा मेळावा पारर पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करुन करण्यात आली. यावेळी भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
भोसले म्हणाले की, ''शहरांच्या उभारणीत, उद्योगांच्या प्रगतीत आणि देशाच्या विकासात श्रमिकांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक इमारतीच्या पायाभरणीपासून ते विकासाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत त्यांचा घाम आणि त्याग दडलेला आहे. मात्र, त्यांच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. “श्रमिकांच्या हक्कासाठी आवाज उठवताना त्यांच्या संघर्षामागील मेहनत आणि त्याग कधीच खचू देत नाही. दिवसेंदिवस संघटित कामगार कमी होत असून असंघटित कामगारांचे प्रमुख प्रमाण वाढत असल्याने समाजात आर्थिक दरी ही भविष्यात वाढत जाणार आहे, त्यामुळे रोजगाराबरोबरच छोट्या उद्योगांवर देखील परिणाम होतील. म्हणूनच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार संघटनांची एकजूट महत्त्वाची आहे. ''
भोसले यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत श्रमिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए प्रकल्पांमुळे लाखो श्रमिकांना राहण्यासाठी घरे उपलब्ध झाली असून यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले. तसेच, श्रमिकांच्या न्याय हक्कांच्या संरक्षणासाठी आणखी सक्षम व मूलभूत कायद्यांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली श्रमिकांना न्याय मिळवण्यासाठी बळ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे श्रमिकांना हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.
या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, युनियन प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकरराव शितोळे, जयदेव अक्कलकोट (चाकण उद्योजक संघटना अध्यक्ष), दीपक पाटील, दिनेश पाटील, ओमकार जोकारे, अंकुश वाघमारे, लताताई पाटील, अमोल घोरपडे, दत्तात्रय गायकवाड, कैलास गव्हाणे, शिरीष सासवडे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.