तडीपार आरोपीकडून कोयता जप्त, चिंचवडमध्ये गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १० - तडीपार आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी लोखंडी कोयता बाळगून उभा असलेल्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ९) सायंकाळी सुमारे ६.०५ वाजता चिंचवड येथील शंकरनगर परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील पशुवैद्यकीय वखार महामंडळाच्या भिंतीजवळ, एक्साईड बॅटरीसमोर सार्वजनिक रस्त्यालगत एक व्यक्ती हातात लोखंडी कोयता घेऊन संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी कारवाई करत निलेश मनोहर गायकवाड (वय ३९, रा. विद्यानगर, चिंचवड) याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश लागू असल्याचे समोर आले. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार ४ मार्च ते १७ मार्च या कालावधीत घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही आरोपीकडे लोखंडी कोयता आढळून आला.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) सह १३५, १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई गणेश कोंडीबा काकड यांनी फिर्याद दिली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.