दुकानाच्या भाड्याच्या वादातून दांपत्याला मारहाण; निगडीत चौघांवर गुन्हा

दुकानाच्या भाड्याच्या वादातून दांपत्याला मारहाण; निगडीत चौघांवर गुन्हा

निगडी | १ ऑक्टोबर २०२६ : दुकानाच्या भाड्याच्या वादातून ४९ वर्षीय महिलेला व तिच्या पतीला  दुकानात ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत प्लास्टिक पॅकिंग मशीन व वजनकाट्यावरील स्टीलच्या प्लेटने डोक्यात मारल्याची घटना निगडी येथे घडली. या मारहाणीत फिर्यादी महिलेचा पती बेशुद्ध झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक दोन याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका ४९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नॅशनल स्वीट अँड ड्रायफ्रूट नावाच्या गाळा क्रमांक ११, निगडी बस स्टॉपमागे, बीजी कॉर्नर, निगडी, पुणे येथे घडली.

याप्रकरणी गणेशराम कानाराम चौधरी (वय ६८), हितेश गणेशराम चौधरी (वय ३७), गजेंद्र गणेशराम चौधरी (वय ३४) आणि शांतीलाल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक दोन हितेश गणेशराम चौधरी याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी क्रमांक एक फिर्यादी यांचे चुलत सासरे आहेत. आरोपींनी फिर्यादीच्या पतीकडे सन २०२२ पासून आजपर्यंतचे दुकानाचे भाडे मागण्याच्या कारणावरून पाठविलेल्या नोटीसला उत्तर सादर केले होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी दुकानात येऊन फिर्यादीच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

फिर्यादी पतीला वाचविण्यासाठी दुकानात गेल्या असता आरोपींनी त्यांना दुकानात ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिली. 

त्यानंतर फिर्यादी दुकानातून आत जात असताना आरोपी क्रमांक तीन याने त्यांचा उजवा हात पकडून ओढला, हातातील बांगडी तोडली, शिवीगाळ करून कानाखाली मारले, तर आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीला हाताने ढकलून अंगावर धावून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories