पंढरपूरात १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, नो व्हेईकल झोन लागू केला होणार
पुणे, ता. २९ - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे तसेच, मंदिर परिसरात 'नो व्हेईकल झोन' लागू केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पालकमंत्री गोरे म्हणाले, मागील वर्षी व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे वारकरी-भाविकांच्या दर्शनासाठी लागणारा वेळ किमान पाच ते सहा तासांनी कमी झाला होता. तसेच 'नो व्हेईकल झोन'मुळे मंदिर प्रदक्षिणा, दर्शन व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन अधिक सुलभ झाले. त्यामुळे यंदाही १० जुलैपासून या दोन्ही निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वारीपूर्वी आठ दिवस नागरी भागात नगरपरिषद आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
पंढरपूर शहर, वाखरी पालखी तळ, ६५ एकर परिसर आणि वाळवंट येथे कायमस्वरूपी व तात्पुरत्या शौचालयांची स्वच्छता, महिला स्नानगृहे, हिरकणी कक्ष, पुरेसे सफाई कर्मचारी, तसेच शौचालय परिसरात मुरमीकरण व काँक्रिटीकरण करण्यावर भर देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पंढरपूर नगरपरिषद यांनी समन्वयाने शहरातील खड्डे दुरुस्त करून मंजूर रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत. आवश्यक निधीची मागणी तातडीने सादर केल्यास तो उपलब्ध करून दिला जाईल, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्काम व विसावा ठिकाणी शौचालये दोन दिवस आधी उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्हा परिषदांनी समन्वय राखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय पालखी मार्गालगतच्या उघड्या विहिरींना सात ते आठ फूट उंच मजबूत बॅरिकेडिंग करणे, चंद्रभागा नदीपात्रातील मोठे खड्डे जेसीबीच्या साह्याने भरणे, तसेच आषाढी एकादशीपूर्वी पाच-सहा दिवस नदीत पाणी पोहोचेल, यासाठी धरणातून विसर्गाचे नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी, असे निर्देश देण्यात आले
वारकरी-भाविकांसाठी पालखी मार्ग, पंढरपूर शहर व पालखी तळ येथे मोठ्या अक्षरातील दिशादर्शक फलक उभारणे, आरोग्य विभागाने तिन्ही जिल्ह्यांना औषधांचा मुबलक पुरवठा करून पालख्यांसोबत आरोग्य पथके तैनात करणे, तसेच वीज वितरण कंपनीने २४ तास मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मुख्यमंत्री आरोग्य रथ (मेडिकल ऑन व्हील) व मुख्यमंत्री वारकरी सेवा सुविधा केंद्रामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पालकमंत्री गोरे यांनी दिले.
प्रशासनाला प्रमुख सूचना
शौचालये, महिला स्नानगृहे, हिरकणी कक्ष व स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था
पालखी मार्गावर शौचालये, दिशादर्शक फलक व आरोग्य पथके
चंद्रभागेत पाणी, नदीपात्रातील खड्डे भरणे व विहिरींना बॅरिकेडिंग
वाखरी-केबीपी कॉलेज रस्ता, स्वच्छता, वृक्षारोपण व प्रकाशव्यवस्था पूर्ण वीजपुरवठा
मुख्यमंत्री आरोग्य रथ आणि वारकरी सेवा सुविधा केंद्र २४ तास कार्यरत ठेवण्याचे नियोजन
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------