केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात लोहगडावर झाले... 'सीन रिक्रीएशन'
पिंपरी, ता. २९ - पुण्यातील युवा उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी सिया गोयल हिला रविवारी (ता. २८) लोहगड किल्ल्यावर नेऊन 'सीन रिक्रिएशन' म्हणजे प्रसंगाची पुनर्निर्मिती केली. ही प्रक्रिया सुमारे अडीच-तीन तास चालली. सीन रिक्रिएशनसाठी पुतळ्याचा वापर करण्यात आला.
लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोपे यांच्या उपस्थितीत पोलिसांचे विशेष तपास पथक रविवारी सकाळी सियाला घेऊन लोहगडावर पोहोचले. ही प्रक्रिया सुमारे अडीच-तीन तास चालली. प्रक्रियेदरम्यान गोपनीयता व सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार साडेदहा वाजेपर्यंत बंद ठेवले होते व पर्यटकांना प्रवेशबंदी होती.
सीन रिक्रिएशनमध्ये, पोलिसांनी सियाकडून प्रत्यक्ष घटनास्थळी केलेल्या सर्व कृती, हालचाली जाणून घेतल्या. त्यासाठी केतनच्या वजनाचा पुतळा आणला होता. गडावर कुठे ट्रेकिंग केले, केतनला कोणत्या ठिकाणी नेण्यात आले, आरोपी चेतन तिथे कसा पोचला, केतनला दरीत कसे ढकलले या सर्व गोष्टी करुन घेतल्या. सीन रिक्रिएशनमधील बाबींची, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, मोबाइल लोकेशन, फॉरेन्सिक तपास आणि साक्षीदारांच्या जबाबांशी पडताळणी केली.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान भक्कम वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुरावे सादर करता यावेत, यासाठी या 'क्राइम सीन रिक्रिएशन'ला विशेष महत्त्व असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी संकलित केलेले सर्व पुरावे आणि निष्कर्ष न्यायालयात सादर केले आहेत.