मालमत्ता कर भरताना १० टक्के सवलत घेण्याची ३० जून २०२६ रोजी शेवटची संधी
१ जुलैपासून थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मोहिम सुरू करण्यात येणार
पिंपरी, ता. २९ - ३० जून २०२६ ही शेवटची मुदत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. ३० जूननंतर या सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वीच मालमत्ता कराचा भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिका हद्दीत सध्या ७ लाख ४४ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख १५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४८३ कोटींहून अधिक मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख ४६ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. या सवलत योजनेला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उर्वरित मालमत्ताधारकांनीही ३० जूनपूर्वी कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.
तसेच, १ जुलैपासून मालमत्ता कर वसुली मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार आवाहन करून तसेच जप्तीच्या नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
मालमत्ता कर सवलतीच्या प्रत्येक मालमत्ताधारकाने लाभ घ्यावा...
''पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास हा आपल्या सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. नागरिकांनी भरलेला प्रत्येक रुपया शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि विविध विकासकामांमध्ये खर्च केला जातो. त्यामुळे ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या मालमत्ता कर सवलतीच्या प्रत्येक मालमत्ताधारकाने लाभ घ्यावा. ''
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
''महापालिकेच्या उत्पन्नातील प्रत्येक रुपया हा नागरिकांच्या सुविधांमध्ये आणि शहराच्या विकासकामांमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे मालमत्ता कराची वेळेत वसुली ही महापालिकेच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांना अधिक लाभ मिळावा म्हणून ३० जून २०२६ पर्यंत १० टक्के सवलत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना देण्यात आली आहे. या अंतिम संधीचा लाभ घेत नागरिकांनी कराचा भरणा करावा. यानंतर महसूल वसुलीच्या नियोजनानुसार विशेष मोहीम राबविण्यात येईल.''
- डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
''मालमत्ता करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटची संधी आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरावा. १ जुलै २०२६ पासून थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, वारंवार नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीसह नियमानुसार कारवाई करण्यात येईल.''
- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका