दापोडीमध्ये मॅफेड्रॉन ड्रग्ज बाळगणाऱ्या दोघांना अटक
पिंपरी, ता. २९ - दापोडी परिसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) या अमली पदार्थाची वाहतूक व विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या कारवाईत सुमारे १० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई शनिवारी (२८ जून) पहाटे ४.५५ वाजता दापोडी पोलीस ठाणे हद्दीतील एमएनजीएल सीएनजी पंपाजवळ, जुन्या पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडलगत सुदामाचे पोहे हॉटेलसमोर करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई रणधिर रमेश माने यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी आर्यन रविंद्र यादव (वय २०, रा. न्यू मोदीखाना कॅम्प, पुणे-१) आणि शोएब शकिल शेख उर्फ वस्ताद (वय २५, रा. रविवार पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण १० लाख ८५ हजार ६००/- रुपये किंमतीचा ९८.५६ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन तसेच एक दुचाकी आणि एक मोबाईल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत हा अमली पदार्थ शोएब शेख उर्फ वस्ताद (रा. गणेश पेठ, पुणे) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.