कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी, ता. २९ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. ही कारवाई शनिवारी (२८ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील दत्त आश्रम मठासमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई निलेश किसन शिंगोटे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश बालाकृष्ण पडाची (वय ३६, रा. लक्ष्मी नगर, लेन क्र. ४, पिंपळे गुरव) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सहआयुक्तांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २४ जून ते ७ जुलै २०२६ या कालावधीत शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे. असे असताना आरोपीकडे एक लोखंडी कोयता आढळून आला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.