महाळुंगे | २ ऑक्टोबर २०२६ : महाळुंगे परिसरात एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी वाहतूक करताना एका २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत एमडी, मोटारसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण ३ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज धनंजय टिळेकर (वय ३०, पोलीस शिपाई, बाणेर पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तेजस तानाजी साळुंके (वय २०, रा.माण, ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासोबत असलेल्या विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास महाळुंगे येथील VTP सर्कल, महाळुंगे-नांदे रोडवर करण्यात आली.
फिर्यादीनुसार, तेजस साळुंके आणि विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून एकूण ७ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण ३ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा अमली पदार्थ अनधिकृतरीत्या आणि बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी वाहतूक करताना दोघे मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम ८(क), २१(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.