वाकड | २ ऑक्टोबर २०२६ : दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून तडीपार केलेले असतानाही कोणतीही परवानगी न घेता हद्दीत प्रवेश करून हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला वाकड पोलिसांनी पकडले. तानाजी कलाटे उद्यानाजवळील मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद गौस रफिक नदाफ, पोलीस हवालदार, वाकड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी साहिल युनूस शेख (वय २२, रा. वाकड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास तानाजी कलाटे उद्यानाजवळील मोकळ्या मैदानात, शंकर कलाटे नगर, वाकड येथे करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ यांच्या २९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१)(ब) अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षे (२४ महिने) तडीपार करण्यात आले होते.
तसेच पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ३० सप्टेंबर २०२६ ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दगड, शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही आरोपी तडीपारीच्या आदेशाचा भंग करून आपल्या कब्जात एक कोयता बाळगून फिरताना मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.