'नारीशक्ती वंदन' हे विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब,
'नारीशक्ती वंदन' हे विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब, महिला लोकप्रतिनिधींनी केला कॉंग्रेसचा निषेध
पिंपरी, ता. २० - 'नारीशक्ती वंदन अधियनिम' हे विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २०) पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. लोकप्रतिनिधी महिलांनी काळ्या रंगाच्या साड्या परिधान करुन नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्याचा निषेध नोंदवला. सभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते भाभसाहेब भोईर यांनी ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, महिला लोकप्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून नारीशक्ती विधेयक नामंजूर केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला व सभा तहकूब करण्याची विनंती केली. त्यानुसार, सभा ५ मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
नगरसेविका योगिता नागरगोजे म्हणाल्या, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्त्रीसन्मानाचे विधेयक संसदेत मांडले ही सर्व महिलांसाठी स्वाभामिनाची गोष्ट होती. पण, विरोधकांनी हे विधेयक फेटाळून स्त्रीशक्तीचा अपमान केला आहे. कॉंग्रेसला स्त्री शक्तीचा विसर पडला आहे.'' नगरसेविका शकुंतला धराडे म्हणाल्या, ''महिला घराबरोबरच देशही सांभाळू शकतात हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती विधेयक मांडले होते. मात्र, या अतिशय महत्त्वाच्या विधेयकाच्या विरोधात मतदान करुन कॉंग्रेसने देशभरातील महिलांचा आनंद हिरावून घेतला आहे. हे विधेयक नामंजूर करणे म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान आहे.''
''आपल्या देशात महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. ऑपरेशन सिंदूर या मोहिमेचे नेतृत्व महिलने केले होते. नारीशक्ती विधेयक फेटाळून विरोधकांनी मूर्खपणा केला आहे. विरोधकांचा निषेध आम्ही करत आहोत.'' भावना नगरसेविका अर्चना तापकीर यांनी व्यक्त केली. ''नारीशक्ती विधेयक नामंजूर होणे हा नारीशक्तीवरील आघात आहे. कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या महिला असून त्यांनी या विधेयकाला विरोध केला याचे नवल वाटते. कॉंग्रेसने केलेला हा अपमान महिला सहन करणार नाहीत.'' असे नगरसेविका रीटा सानप म्हणाल्या.
नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या, ''महिलांना घाबरुन कॉंग्रेसने नारीशक्ती विधेयक फेटाळले आहे. नारीशक्ती विधेयक म्हणजे देशभरातील महिलांना पुढे जाण्याची, नेतृत्व करण्याची संधी होती. विधेयक फेटाळणाऱ्या कॉंग्रेसचा निधेष आहे.'' ''ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. बदल घडवण्यासाठी स्त्री शक्तीचे महत्व ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन विधेयक आणले होते, तेव्हाच आनंद झाला होता. मात्र, कॉंग्रेसने देशभारतील महिलांचा आनंद हिरावून घेतला आहे. सभागृहातील आम्ही सर्व महिला लोकप्रतिनिधी कॉंग्रेसचा निषेध करत आहोत.''