जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला किवळेगावातून अटक
पिंपरी, ता. २७ - बेकायदेशीरपणे ५० हजार ५०० रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगणाऱ्या २५ वर्षीय युवकाला रावेत पोलिसांनी शनिवारी (ता. २६) किवळेगावातून अटक केली. त्याच्याजवळचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. या युवकावर रविवारी (ता. २६) रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुबारक उर्फे डब्या माजिद कुरेशी (वय २५ वर्षे) हा वारजे माळवाडी येथे राहतो. त्याने, बंदुका किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगण्याबाबत असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन ५०,५००/- किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतुस (राऊंड) असे कोणताही कायदेशीर परवाना नसताना बाळगले होते. किवळेगाव येथील बापदेव महाराज मंदीराशेजारील मोकळ्या मैदानात तो पिस्तूलासह पोलिसांना सापडला.
आरोपीविरोधात रावेत पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.