पुणे रेल्वेस्थानकातून दहा लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरणाऱ्या आरोपीला दोन तासांत अटक
पुणे रेल्वेस्थानकातून दहा लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरणाऱ्या आरोपीला दोन तासांत अटक
पुणे, ता. २२ - 'यात्री सुरक्षा' मोहिमेअंतर्गत रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) पुणे रेल्वेस्थानकावरील चोरीचा अवघ्या दोन तासांत तपास केला. पुणे रेल्वेस्थानकातून पुणे अजनी हमसफर एक्स्प्रेसमधून दहा लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेला संपूर्ण ऐवज जप्त करण्यात आला आहे. राजकुमार शंकर पवार (वय ३३, रा. बिदर, कर्नाटक) असे अटक आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरपीएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक २२१३९ पुणे-अजनी हमसफर एक्स्प्रेसने १८ एप्रिल रोजी प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची पर्स कोच ए - २ मधील आसन क्रमांक ३६ वरुन चोरीला गेली होती. या पर्समध्ये १२६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १२ हजार रोख रक्कम असा एकूण सुमारे १०.३२ लाखांचा ऐवज होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु होता. तक्रार मिळताच आरपीएफच्या तेजस्विनी सीपीडीएस पथकाने तत्काळ तपास सुरु केला. पुणे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत संशयिताची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पाठलाग करुन अवघ्या दोन तासांत आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
याबाबत बोलताना, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहेरा म्हणाले, ''पुणे स्थानकावर अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफकडून स्थानकावर वेगवेगळ्या टप्प्यात चोवीस तास पथक नेमली आहे. काही अनुचित प्रकार घडले तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येते.''
- तपास, Investigation, सीसीटीव्ही, CCTV, तेजस्विनी सीपीडीएस पथक, Tejaswini CPDS team
- आरोपी, Accused, अटक, Arrest, आरपीएफ, RPF (Railway Protection Force), लोहमार्ग पोलिस, Railway Police
- चोरी, Theft, पर्स, Purse, दहा लाख, Ten lakh, ऐवज, Valuables,
- पुणे अजनी हमसफर एक्स्प्रेस, Pune Ajni Hamsafar Express
- पुणे रेल्वेस्थानक, Pune Railway Station,