'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (आयटीएमएस) प्रकल्प अंतिम टप्यात, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती
'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (आयटीएमएस) प्रकल्प अंतिम टप्यात, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती
पुणे, ता. २२ - पुण्यातील वाहतूकीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी हाती घेण्यात आलेला 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (आयटीएमएस) प्रकल्प अंतिम टप्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
'सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे'द्वारे आयोजित करण्यात आलेल्या 'पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग' कार्यक्रमात अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील बोलत होते. 'ग्लोबल सस्टेनिबिलिटी इम्पॅक्ट कोच' आणि 'सेवा ब्रिज फाउंडेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण डी. एम., पिनॅकल इंडस्ट्रीजचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, क्लायमेंट टूपर्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नटराजन, सिम्बायोसिसच्या मेडिकल आणि हेल्थ सायन्स विभागाचे कुलसचिव प्रा. राजीव येरवडेकर, 'सीप'चे अध्यक्ष शिवराज साबळे, उपाध्यक्ष शिवेश विश्वनाथ, माजी अध्यक्षा विनिता गेरा, व्यवस्थापकीय समिती सदस्य बालचंद्र नामजोशी, अवंती कदम या वेळी उपस्थित होते.
मनोज पाटील म्हणाले, 'पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गहन होत आहे. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांचे प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत आहे. खासगी वाहनांची संख्या ७९ लाखांपर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम, प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. 'आयटीएमएस' प्रकल्पाच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवली जाईल, बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई केली जाईल आणि वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात त्वरित दंडात्मक कारवाई (ई-चलन) करण्यात येणार आहे.'' वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. शहरात नव्याने होणारे रस्ते, उड्डाणपुलांची माहिती घेऊन तेथील वाहतूक नियोजनाबाबत कामे होत आहे, असे मनोज पाटील यांनी सांगितले.