बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि बिल्डरवर तात्काळ गुन्हा दाखल करा

बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि बिल्डरवर तात्काळ गुन्हा दाखल करा

पिंपरी-चिंचवड | ६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाशेजारी सुरू असलेल्या सुखवाणी असोसिएट्स बिल्डर्स अँड प्रमोटर्सच्या खासगी प्रकल्पासाठी ५२ जुन्या झाडांची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वृक्ष संवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि बिल्डरसह जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे.

याबाबत काळे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, बांधकामात अडथळा ठरत असल्याचे कारण देत ५२ जुन्या झाडांची तोड करण्यात आली. झाडांची संख्या आणि वय कमी दाखवून अहवालात फेरफार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात वृक्ष संवर्धन विभागातील महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वृक्षतोडीस मान्यता देताना वृक्ष प्राधिकरणाची दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित प्रकल्पाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली असल्यास ती तातडीने थांबवावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे.

तसेच सुखवाणी बांधकाम व्यावसायिकाकडून १,०१८ झाडे लावण्यासाठी प्रति वृक्ष १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपये भरून घ्यावेत आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पुरेशी जाहीर नोटीस न देता किंवा निष्काळजीपणे वृक्षतोडीची परवानगी देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करावी, अशी मागणीही काळे यांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी व कारवाई करावी; अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रविराज काळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories