अभिजात मराठी सप्ताहात ‘फॅमिली’चा हास्यकल्लोळ; सचिन खेडेकर यांच्या ‘भूमिका’ला दाद

अभिजात मराठी सप्ताहात ‘फॅमिली’चा हास्यकल्लोळ; सचिन खेडेकर यांच्या ‘भूमिका’ला दाद

पिंपरी | ६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त मराठी रंगभूमीचे दोन वेगवेगळे रंग अनुभवायला मिळाले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाने प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकातील ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांच्या अभिनयाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जात आहे.

५ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सत्रात झालेल्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ नाटकातून दोन कुटुंबांमधील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नाच्या गडबडीतून निर्माण होणारे विनोदी प्रसंग रंगविण्यात आले. कुटुंबातील व्यक्तींच्या उणिवा स्वीकारून प्रेम आणि आपलेपणा जपण्याचा संदेशही नाटकातून देण्यात आला.

यानंतर ‘भूमिका’ने रंगमंचाला गंभीर आणि वैचारिक वळण दिले. एका अभिनेत्याला साकाराव्या लागणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात, विचारांमध्ये आणि नातेसंबंधांत होणारे बदल नाटकातून मांडण्यात आले. सामाजिक समता, अस्मिता, संविधानिक मूल्ये आणि मानवी नातेसंबंधांच्या मांडणीला सचिन खेडेकर यांच्या अभिनयाची जोड मिळाली.

रात्रीच्या सत्रात लोकजागर ऍक्टिव्हिटीजच्या ‘सणयात्रा’ कार्यक्रमातून मराठी सण, त्यामागील परंपरा आणि कथा नृत्य-संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या.

दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध नाट्यगृहांत ‘फोक लावणी’, भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’, ‘स्वर मराठी मनाचा’, ‘लावण्यरंग’, ‘गझलभाव’, स्वप्नील जोशी आणि विदुला चौगुले अभिनीत ‘लग्नपंचमी’, कवी संमेलन, शाहिरी पोवाडे तसेच लोकगायक नंदेश विठ्ठल उमप यांचा ‘मी मराठी’ लोककला सोहळा यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories