पिंपरी-चिंचवड | ५ ऑक्टोबर २०२६ : लोकशाही आणि संविधानाच्या सुरक्षेसह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड इंडिया आघाडी, सिव्हिल सोसायटी, पुरोगामी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी ‘लोकशाही बचाव मार्च’ काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता आकुर्डी गावातील विठ्ठल मंदिर येथून मार्चला सुरुवात होऊन निगडी येथील तहसीलदार कार्यालयाजवळ त्याची सांगता होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, मतदार याद्यांमधील बदल, पात्र मतदारांच्या नावांबाबत उपस्थित होणारे प्रश्न आणि विशेष पुनर्परीक्षण अभियान (SIR) यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक असावी, अशी भूमिका घेत निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मार्चमधून करण्यात येणार आहे.
आयोजकांनी जाहीर केलेल्या मागण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय मतदार यादी विशेष पुनर्परीक्षण अभियान (SIR) रद्द करावे, निवडणूक आयोगाचे कामकाज पारदर्शक, निष्पक्ष आणि स्वतंत्र पद्धतीने व्हावे तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या निर्णयांचे स्वतंत्र पुनर्परीक्षण करण्यात यावे, अशा मागण्याही आयोजकांकडून करण्यात येणार आहेत.
या मार्चमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी, पुरोगामी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.