देशातील पहिले 'एआय' धोरण येत्या तीन ते चार महिन्यांत आणणार - उद्योगमंत्री उदय सामंत
पिंपरी, ता. २२ - देशातील पहिले 'एआय' धोरण राज्यातील उद्योगविश्वासाठी येत्या तीन ते चार महिन्यांत आणणार आहोत. हे धोरण राज्यातील उद्योग विश्वासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात काय परिणाम होऊ शकतो, याचा सखोल अभ्यास केला जात आहे." अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी उदय सामंत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. सामंत म्हणाले, "पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, पर्यावरण विभाग यांनी एकत्र येत दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा नदी सुधार आराखडा बनविला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. इंद्रायणी आणि पवना नदी शुद्धीकरण प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल. ''
''रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जाऊ नये यासाठी सामायिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) केंद्रासाठी भोसरी एमआयडीसीतील जागेची निवड केली होती. मात्र, नागरिकांच्या तक्रारी आल्या. त्यामुळे एसटीपी व सीईटीपी प्रकल्प राबवताना लोकांना त्याचा त्रास होणार नाही, अशी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत जागेचा प्रश्न सुटेल.'', असे सामंत यांनी सांगितले. तसेच शहरातील प्रलंबित प्रकल्पांबाबत शहरातील नगरसेवक व उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे, हिंजवडी येथील उड्डाणपुलासाठी साडेसहाशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत व या उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम सुरु आहे, महापालिका व नगरपंचायतींमधील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिली जाणार आहे असे सामंत यांनी सांगितले.