शहरात पोलिसांच्या दोन स्वतंत्र कारवाईत कोयत्यासह दोन तरुणांना अटक!

शहरात पोलिसांच्या दोन स्वतंत्र कारवाईत कोयत्यासह दोन तरुणांना अटक!

पिंपरी-चिंचवड | ३० सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्या दोन तरुणांवर पोलिसांनी स्वतंत्र कारवाया केल्या आहेत. आळंदी परिसरातील सोळू येथे २० वर्षीय तरुणाला, तर भोसरीतील गावजत्रा मैदानात २३ वर्षीय तरुणाला कोयत्यासह पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई २९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आळंदी-मरकळ रोडवरील प्रदीप ठाकूर यांच्या प्लॉटशेजारी, सोळू येथे करण्यात आली. संकेत बजरंग गांगाधरे (वय २०, रा. भारत पेट्रोल पंपासमोर, एमआयसी कंपनीशेजारी, सोळू, ता. खेड) याच्याकडे विनापरवाना ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-३ मधील पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे.

दुसरी कारवाई त्याच दिवशी दुपारी ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास भोसरी येथील गावजत्रा मैदानातील मोकळ्या मैदानात करण्यात आली. युवी करण परिहार (वय २३, रा. गंधर्व नगरी, मोशी; मूळ रा. लमकी, जि. कैलाली, अमगुर, नेपाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कोणत्याही परवान्याविना २०० रुपये किमतीचा एक कोयता आढळून आल्याचेपोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई वैभव पुरुषोत्तम वाटकर यांनी फिर्याद दिली आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

आळंदी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाच्या कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संबंधित कलमानुसार, तर भोसरी पोलीस ठाण्यातही शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories