आळंदीत मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदीवरील चारही पूलांवरील वाहतूक बंद
पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे व आणखी वाढत आहे. नदीवरील भक्त पुंडलिक मंदिर तसेच घाटाशेजारील काही दुकाने पाण्यात गेली असून प्रमुख चारही पूलांवर पाणी आले आहे. त्यामुळे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटेपासून आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल, चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल, सिद्धबेट परिसरातील पूल व पीएमपीएल बस स्थानकाशेजारील नवीन पूल असे चारही पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सर्व भाविक, वारकरी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही सार्वजनिक सूचना जारी केली आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे कोणत्याही नागरिकाने इंद्रायणी नदीपात्राकडे किंवा नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित क्षेत्रातून जाण्याचाही प्रयत्न करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळपासून नदीची पाणीपातळी अधिकच वाढली होती. त्यानंतर सायंकाळी व रात्रभर पावसाचा जोर वाढल्याने तसेच धरणातून इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी नदीने रुद्रावतार धारण केला आहे. रविवारी पहाटे इंद्रायणी नदीचे पाणी सिद्धबेट शेजारील तसेच गरुडस्तंभ शेजारील पुलावर आले. त्यानंतर उर्वरित पीएमपीएल पुलाला पाणी लागले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस व नगरपालिका प्रशासनाने इंद्रायणी नदीवरील जुना पूल, चाकण चौकातील मुख्य पूल व सिद्धबेट लगतचा नवीन पूल बॅरिकेट लावून दळणवळणासाठी बंद केले. त्यामुळे शहराकडे येणारी व पुण्याला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. मात्र दुपारी तीननंतर नवीन पुलालाही पाणी लागल्याने हा पुलही बंद करण्याचा निर्णय घेतला रस्त्याला बॅरिकेट लावून सील करण्यात आले. त्यामुळे दुपारनंतर शहराकडे येणारी जाणारी वाहतूक ठप्प झाली होतील.
इंद्रायणी घाटावर भाविकांनी जाऊ नये यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने नगरपरिषद चौक, महाराष्ट्र बँक, पान दरवाजा, शनी मंदिर, झाडी बाजार पार्किंग, इंद्रायणी नगर कमान, विश्वशांती केंद्र हवेली बाजू घाट आदी ठिकाणी आवश्यक ठिकाणी लाकडी बांबू व लोखंडी पत्रे लावून रस्ते बंद केले आहेत. तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दक्षतेचा उपाय म्हणून नदीशेजारील दुकाने बंद ठेवली आहेत. पाऊस वाढत असल्याने इंद्रायणीच्या महापूराकडे नागरिकांनी व भाविकांनी जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर व वरीष्ठ पोलीस अधिकारी भीमा नरके यांनी केले आहे.