'लोहगडाबाबत समाजमाध्यमांवरील 'Siya Point'सारखे उल्लेख तात्काळ हटवा, गड-किल्ल्यांसाठी स्वतंत्र संरक्षण धोरण तयार करा'

'लोहगडाबाबत समाजमाध्यमांवरील 'Siya Point'सारखे उल्लेख तात्काळ हटवा, गड-किल्ल्यांसाठी स्वतंत्र संरक्षण धोरण तयार करा'

'लोहगडाबाबत समाजमाध्यमांवरील 'Siya Point'सारखे उल्लेख तात्काळ हटवा, गड-किल्ल्यांसाठी स्वतंत्र संरक्षण धोरण तयार करा'

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

पुणे, ता. ४ जुलै २०२६ - लोहगड किल्ल्यावर  घडलेली केतन अग्रवाल हत्येची घटना संपूर्ण समाजाला वेदना देणारी आहे. यातील दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची (AMGM) स्पष्ट भूमिका आहे. मात्र या घटनेनंतर समाजमाध्यमे, काही वृत्तमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोहगड किल्ल्याची जी बदनामी सुरु आहे, ती अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशासाठी धोक्याची घंटा आहे. या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

महासंघाने निवेदनात म्हटले आहे की, लोहगड हा केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा तो साक्षीदार असून लाखो शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहकांसाठी तो श्रद्धेचे स्थान आहे. अशा गडाची ओळख एखाद्या दुर्दैवी गुन्हेगारी घटनेशी जोडणे, त्या ठिकाणाला नवीन नाव देणे किंवा त्यावर विनोद, मीम्स, रील्स आणि सनसनाटी स्वरूपातील मजकूर प्रसारित करणे, हा आपल्या इतिहासाचा आणि समाजाच्या भावनांचा अवमान आहे.

गेल्या काही दिवसांत लोहगडावरील एका कड्याचा 'Siya Point'असा उल्लेख समाजमाध्यमांवर आणि काही डिजिटल माध्यमांमध्ये केला जात असून, गुगल मॅपवरही अशा प्रकारचे उल्लेख दिसून येत आहेत. परिणामी त्या ठिकाणी केवळ उत्सुकतेपोटी नागरिकांची गर्दी होत आहे. एखाद्या गुन्हेगारी घटनेला पर्यटनाचे किंवा आकर्षणाचे स्वरूप प्राप्त होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारामुळे भविष्यात इतर ऐतिहासिक वारसा स्थळांच्याही संदर्भात अशाच प्रवृत्ती वाढण्याची भीती आहे.

 त्यामुळे शासनाने डिजिटल माध्यमांमध्ये ऐतिहासिक स्थळांची बदनामी करणाऱ्या चुकीच्या नामकरणावर, दिशाभूल करणाऱ्या मजकुरावर आणि सनसनाटी प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करणे आवश्यक आहे.

याशिवाय, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर व्यावसायिक स्वरूपातील प्री-वेडिंग शूट, फॅशन शूट, रील्स, म्युझिक व्हिडिओ आणि इतर व्यावसायिक चित्रीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकदा अशा चित्रीकरणादरम्यान गडांचे पावित्र्य, ऐतिहासिक संदर्भ आणि पर्यावरण यांचा विचार केला जात नाही. जगातील अनेक वारसा स्थळांवर तसेच धार्मिक स्थळांवर छायाचित्रण आणि व्यावसायिक चित्रीकरणाबाबत कठोर नियम लागू आहेत. काही ठिकाणी मोबाईल किंवा कॅमेरालाही परवानगी नसते. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांनाही अशाच प्रकारचे संवेदनशील संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.

महासंघाने स्पष्ट केले की, सामान्य पर्यटकांनी आठवणी म्हणून छायाचित्रे काढण्यास कोणताही आक्षेप नाही. मात्र व्यावसायिक प्री-वेडिंग शूट, फॅशन शूट, जाहिराती, सोशल मीडिया कंटेंट निर्मिती किंवा तत्सम व्यावसायिक उपक्रमांसाठी स्पष्ट धोरण, पूर्वपरवानगी, आचारसंहिता आणि उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईची तरतूद असावी.


महासंघाच्या प्रमुख मागण्या अशा....

●'Siya Point'सह सर्व आक्षेपार्ह व दिशाभूल करणारे डिजिटल उल्लेख तात्काळ हटविण्यात यावेत.

● Google Maps आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील चुकीची नामकरणे रद्द करण्यात यावीत.

● ऐतिहासिक वारशाची बदनामी करणाऱ्या डिजिटल आशयाविरुद्ध स्वतंत्र धोरण तयार करण्यात यावे.

● गड-किल्ल्यांवरील व्यावसायिक प्री-वेडिंग शूट, रील्स, जाहिराती व तत्सम चित्रीकरणासाठी स्पष्ट नियमावली जाहीर करण्यात यावी.

● नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

● महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या सन्मान व पावित्र्याच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन राज्यस्तरीय धोरण आखण्यात यावे.

   


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories