आळंदी | २ ऑक्टोबर २०२६ : दिवेआगार येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने आळंदी आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आज, २ ऑक्टोबर रोजी आळंदी आणि केळगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत पोपटराव कुऱ्हाडे तसेच समस्त आळंदी आणि केळगाव ग्रामस्थांच्या वतीने व्यापारी, व्यावसायिक, संस्था, संघटना आणि नागरिकांना या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवेआगार दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ परिसरातील नागरिकांनी एकजूट दाखवत शोक व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक व्यापारी आणि व्यावसायिकांनीही बंदला पाठिंबा दर्शविल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बंदमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रुग्णालये, औषध दुकाने, रुग्णवाहिका सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या सेवा नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
दिवेआगार येथील दुर्घटनेमुळे आळंदी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध ठिकाणी प्रार्थना सभा आणि श्रद्धांजली कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे.