अफेअरच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला; चौघांना अटक

अफेअरच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला; चौघांना अटक

चिंचवड | १ ऑक्टोबर २०२६ : पत्नीशी पुन्हा अफेअर सुरू असल्याच्या संशयातून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिंचवड परिसरात घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका विधिसंघर्षित बालकाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईल गणी शेख (वय ४७, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात अभिषेक लालमण यादव (वय १९, रा. चव्हाणनगर, देहूगाव), नागेश व्यंकटराव चोपडे (वय २२, रा. चिखली गावठाण), आशितोष दयानंद शितोळे (वय २५, रा. मातोश्री मेडिकलजवळ, दुर्गानगर, चिखली), अभिषेक लाल गिरिगोसावी (वय १९, रा. मोरया प्रॉपर्टी, येलवाडी, देहूगाव) आणि एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे. आरोपी क्रमांक एक ते चार अटकेत आहेत.

फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी एचपी पेट्रोलपंप परिसरात तसेच फिर्यादीच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपी अभिषेक यादव याला त्याची पत्नी निशा हिच्याशी इरफान याचे पुन्हा अफेअर सुरू असल्याचा संशय होता.

याच कारणावरून आरोपींनी इरफान याच्यावर कोयत्याने पाठी-मणक्याजवळ, उजव्या हाताच्या अंगठ्यावर, डाव्या हाताच्या पंजावर, हाताच्या कोपराजवळ तसेच डोक्याच्या डाव्या बाजूस कपाळावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याला हाताने आणि लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली.

इरफान जीव वाचविण्यासाठी पळत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्याला पकडून “तुला किती पळायचे पळ, तुला जिवंत सोडणार नाही. कोणी जर मध्ये आले तर कोणालाच सोडणार नाही,” असे म्हणत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी आणि त्यांचा भाऊ अहमद हे इरफान यास वाचविण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांनाही कोयत्याने मारून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories