अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी 29 सप्टेंबरला मुंबईत निर्धार मोर्चा; आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात एल्गार
पिंपरी-चिंचवड : अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण लागू करून मातंग समाजासह इतर वंचित घटकांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय नोकऱ्यांत न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीसाठी 29 सप्टेंबरला मुंबईत ‘निर्धार मोर्चा’ काढण्यात येणार आहे. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होणार असून, राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, ही या आंदोलनाची मुख्य भूमिका आहे. काही समाजघटकांना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा दावा करत उपवर्गीकरणाची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. शिक्षण, रोजगार आणि शासकीय भरती प्रक्रियेत संधींचे अधिक समतोल वाटप व्हावे, यासाठी स्वतंत्र उपवर्गीकरण आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आतापर्यंत 75 हून अधिक मोर्चे व आंदोलने करण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता मुंबईतील मोर्चाद्वारे मागणीला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. हा मोर्चा हक्क, अस्तित्व आणि सामाजिक न्यायासाठीचा निर्णायक टप्पा असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे.
“आरक्षणाचा मूळ उद्देश सर्वांचा सर्वांगीण विकास हा आहे. मात्र, अनुसूचित जातीतील काही घटकांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही. शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या संधींपासून कोणताही वंचित घटक दूर राहू नये, यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण गरजेचे आहे. शांततापूर्ण मार्गाने राज्यभरात आम्ही आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे. मुंबईतील निर्धार मोर्चा हा हक्काचा, अस्तित्वाचा आणि न्यायाचा लढा आहे,” असे आमदार गोरखे यांनी निवेदनात म्हटले आहे.
मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनुसूचित जाती आरक्षणात तातडीने उपवर्गीकरण लागू करणे, मातंग व इतर वंचित समाजघटकांना हक्काचा वाटा देणे, शिक्षण व रोजगारामध्ये समान संधी उपलब्ध करणे आणि शासकीय भरती प्रक्रियेत न्याय्य प्रतिनिधित्व देणे यांचा समावेश आहे.
मातंग, मादिगा, बुरूड, चर्मकार तसेच अन्य वंचित समाजघटक आणि त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील नागरिक एकत्र येऊन मागण्यांसाठी आवाज उठवतील, असा आयोजकांचा दावा आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सहभागी नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था राखून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.