पिंपरी-चिंचवड : दिघी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट-3 ने 12 तासांत उलगडा केला. तपासात घरात लपवून ठेवलेले ₹13,98,978 मूल्याचे सोने व चांदीचे दागिने पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 621/2026 नोंद आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3) आणि 305(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-3 ने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासले. संबंधित मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषणही करण्यात आले. इमारतीत बाहेरील व्यक्ती आल्याचा पुरावा मिळाला नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना विश्वासात घेऊन चौकशी करण्यात आली; मात्र चोरीशी संबंधित ठोस पुरावा हाती आला नाही.
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि पोलीस हवालदार युवराज बिराजदार यांनी घरातील महिलेची सखोल चौकशी केली. चौकशीत तिच्या पतीकडून सोने-चांदीचे दागिने विकून नवीन घर खरेदी करण्याचा विचार सुरू असल्याचे तिने सांगितले. दागिने विकले जाऊ नयेत, या भीतीतून ते घरातच लपवून ठेवल्याची माहिती तिने दिली.
त्यानंतर लपवून ठेवलेले सोने-चांदीचे दागिने पंचांसमक्ष काढून ताब्यात घेण्यात आले. या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील जावळे, उपनिरीक्षक भरत गोसावी, युवराज बिराजदार, शशिकांत नांगरे, नितीन गुंजाळ, निखिल फापाळे, दिलीप राठोड आणि स्वप्निल महाले यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.