गणेशोत्सव शांततेत पार; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मानले आभार

गणेशोत्सव शांततेत पार; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मानले आभार

पिंपरी-चिंचवड | २६ सप्टेंबर २०२६ : यंदाचा गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नागरिकांचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आभार मानले आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता उत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोलीस आयुक्त चौबे यांनी दिलेल्या संदेशात पिंपरी-चिंचवड महापालिका, सर्व नगरपरिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर विभागांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत केलेल्या सहकार्याबद्दलही आभार व्यक्त केले आहेत.

गेल्या बारा दिवसांमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी अत्यंत परिश्रमपूर्वक, शिस्तीत आणि सजग राहून चोख बंदोबस्त ठेवला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा सुरळीत व शांततेत पार पडल्याचे चौबे यांनी नमूद केले. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

गणेशोत्सव काळात शहरातील विविध भागांमध्ये विसर्जन मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिक, गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पोलीस यांच्यातील समन्वयामुळे उत्सव शांततेत पार पडल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

भविष्यातही पोलीस प्रशासन, गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमध्ये असेच उत्तम सहकार्य कायम राहील आणि सर्वजण संघभावनेने शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्यरत राहतील, असा विश्वास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories