कुरुळी येथे किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला
पिंपरी, ता. १६ - खेड तालुक्यातील कुरुळी गावातील डोंगरे वस्ती येथे किरकोळ शाब्दिक वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने व चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. १५) घडली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अद्याप अटक झालेली नाही.
फिर्यादी संतोष शिवाजी ताजने (वय २४ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता झालेल्या शाब्दिक वादाचा राग मनात धरून आरोपी सागर देवानंद धांडे (वय २८ वर्षे, चालक, रा. कुरुळी, ता. खेड) याने दारूच्या नशेत फिर्यादी संतोषवर हल्ला केला.
आरोपीने मोठमोठ्याने आरडाओरड करत, लाकडी दांडके व चाकूचा वापर करुन संतोषच्या डोक्यावर, डाव्या डोळ्याजवळ तसेच उजव्या पायाच्या पोटरीवर मारहाण करुन त्याला जखमी केले. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.