बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी २३ एप्रिलला कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी २३ एप्रिलला कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर
पुणे, ता. २१ - बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी येत्या २३ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदारांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बारामती मतदारसंघातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी हे कामानिमित्त मतदान क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये खासगी कंपन्या, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, शॉपिंग मॉल्स, आयटी कंपन्या तसेच विविध व्यापारी व औद्योगिक आस्थापनांचा समावेश आहे.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे आवश्यक राहील. मतदानासाठी आवश्यक सुट्टी अथवा सवलत न दिल्यामुळे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्यास, आस्थापनांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ही मतदानाची सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू राहील, असे प्रशासनाने कळवले आहे.