news
clock
रक्षक चौकातील उड्‌डाणपुलामध्ये आढळल्या त्रुटी, दुरुस्ती करण्याचे खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

रक्षक चौकातील उड्‌डाणपुलामध्ये आढळल्या त्रुटी, दुरुस्ती करण्याचे खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

रक्षक चौकातील उड्‌डाणपुलामध्ये आढळल्या त्रुटी, दुरुस्ती करण्याचे खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश 

पिंपरी, ता. २६ - औंध-रावेत बीआरटी रोडवरील रक्षक चौकात उड्‌डाणपुलाचे काम सुरु आहे. उड्डाणपूलाववरील तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होऊ शकतात. त्यासाठी या उड्डाणपुलाची लांबी वाढवून उतार कमी करण्याचे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. उपययोजना न करता हा पूल खुला केल्यास आणि भविष्यात पुलावरील उतारावरुन पडल्याने अपघात झाल्यास संबंधित कन्सल्टंट, अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे.

खासदार बारणे यांनी गुरुवारी (ता. २६) प्रत्यक्ष पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी इंफ्राकिंग कन्सल्टिंग प्रा. लि. कंपनीचे सीईओ डॉ. संजय नाईक, महापालिकेच्या सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता सुनिल पवार, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, उपअभियंता निलेश दाते, प्रोजेक्ट मॅनेजर धनाजी मिसाळ, कनिष्ठ अभियंता प्रणिता पिंजन यावेळी उपस्थित होते. 

खासदार बारणे म्हणाले, ''महापालिकेच्या वतीने औंध-रावेत बीआरटी रोडवरील रक्षक चौकात सध्या उड्‌डाणपुलाचे काम सुरु आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु, पुलाची पाहणी केली असता पुलाचा दोन्ही बाजूंचा उतार अत्यंत तीव्र आहे. या पुलाचे कन्सल्टंट में इन्फाकिंग कन्सल्टिंग इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि ठेकेदार मे.टी ॲन्ड टी इन्फा लिमिटेड व महापालिका अधिकारी यांनी उताराच्या तांत्रिक बाबीकडे पुरेसे लक्ष दिलेले दिसत नाही.  उताराचा भाग तुलनेने अधिक असल्याने भविष्यात अपघाताची शक्यता टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी निगडी येथील मधुकर पवळे उड्‌डाणपुलाचा उत्तारही असाच तीव्र झाल्याने तिथे सातत्याने अपघात होतात.''

रक्षक चौक हा वर्दळीचा व वाह‌तुकीचा रस्ता असल्याने या तीव्र उतारामुळे भविष्यात येथेही मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.''

  ''पुलाच्या कामाची निविदा २२.७७ कोटी रुपयांची आहे. या ठेकेदारास आता पर्यंत ७५ टक्के रक्कम देण्यात आली आहे. संभाव्य अपघातांचा धोका टाळण्यासाठी पुलाची लांबी वाढवावी. उतार कमी करण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात. योग्य संकेतचिन्हे आणि तांत्रिक उपाययोजना करण्यात याव्यात. या कामासाठी झालेला खर्च, कामाची सुरुवात आणि तांत्रिक माहिती यांचा आढावा घेऊन तात्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत.'', अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सुचना देऊनही चुका केल्यास आणि पुल कार्यरत झाल्यानंतर अपघात झाल्यास कन्सल्टंट व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा खासदार बारणे यांनी दिला.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories