दुचाकी चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

दुचाकी चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

बावधन | ३ ऑक्टोबर २०२६ : मोटारसायकलींची चोरी करून त्यांचे स्पेअरपार्ट खोलून भंगार दुकानदारांना विकणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून ५ मोटारसायकली आणि मोटारसायकलींचे स्पेअरपार्ट असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन लेअर सोसायटी, बाणेर येथे ७ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० ते ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान यामाहा एमटी-१५ मोटारसायकल क्रमांक MH-13-EW-5847 चोरीला गेली होती. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने परिसरातील १० ते १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपींचा माग काढला. तपासात चोरीची मोटारसायकल इंगवले चौक, पिंपळे निलख येथे नेल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पथकाने इंगवले चौक परिसरात शोध घेतला असता ऋषीकेश शहाजी साठे (वय २९, रा. गणेशनगर, पिंपळे निलख) याचे फॅब्रिकेशनचे दुकान असल्याचे समोर आले. चोरीच्या मोटारसायकलीचे स्पेअरपार्ट करून ते आरोपीमार्फत भंगार दुकानदारांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात पवन मरीआप्पा भज्जी (वय २५, रा. मेडीपॉईंट चौक, औंध), ऋषीकेश शहाजी साठे (वय २९) आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ५ मोटारसायकलींसह अन्य स्पेअरपार्ट जप्त करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींविरोधात यापूर्वीही वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories