भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या कामासाठी जुन्याच ठेकेदाराला कंत्राट नको ..........नगरसेविका सुलभा उबाळे यांची भूमिका, महापालिका आयुक्तांना निवेदन
भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या कामासाठी जुन्याच ठेकेदाराला कंत्राट नको
नगरसेविका सुलभा उबाळे यांची भूमिका, महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी, ता. ६ - भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी जुन्या ठेकेदाराला कंत्राट देण्याच्या हालचाली महापालिकेत सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी जुन्या ठेकेदाराला पुन्हा काम देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यांनी अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबवून नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्याची ठाम मागणी केली आहे. याबाबत उबाळे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे की, सध्या पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी १६७ दशलक्ष लिटर पाणी आरक्षित असलेल्या भामा आसखेड जलवाहिनीचे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, कामाची गती अत्यंत संथ आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास मोठा विलंब झाला आहे. तीन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ७० टक्केच काम पूर्ण झाले आहे. मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न केल्याने तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित ठेकेदाराला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही आता पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवीन निविदा प्रक्रिया केल्यास वेळ लागेल हे कारण देत जुन्याच ठेकेदाराला काम देणे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबवून एका महिन्याच्या आत नवीन ठेकेदार नेमून उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, असे सुलभा उबाळे यांनी सुचवले आहे.