भोसरी | ८ ऑक्टोबर २०२६ : वाहनाचा दंड थकीत असल्याचा बनावट मेसेज पाठवून एका व्यावसायिकाची 9 लाख 99 हजार 971 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळासारखी दिसणारी लिंक पाठवून मोबाईलवर APK ॲप उघडण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर मोबाईलवर आलेल्या OTP आणि व्यवहाराच्या संदेशांद्वारे बँक खात्यातून पैसे वळविण्यात आल्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे.
या प्रकरणी वनायक शंकर पाटील (वय ४५, रा. भोसरी, पुणे; मूळ रा. कुची, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात Axis Bank खातेधारक आणि मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.१० ते ७.१३ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलवर त्यांच्या MH 14 MF 6682 या वाहनाचा दंड थकीत असल्याचा इंग्रजी संदेश आला. दंड न भरल्यास प्रकरण न्यायालयात पाठविण्यात येईल, असे त्यात नमूद होते.
या संदेशात vehicles.mparivahan.autos ही लिंक देण्यात आली होती. ती परिवहन विभागाची अधिकृत वेबसाइट असल्याचे भासविण्यात आले. फिर्यादीने लिंक उघडल्यानंतर परिवहन विभागाच्या नावासारखे दिसणारे Mparivahan.apk हे ॲप उघडण्यात आले.
त्यानंतर फिर्यादी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक OTP संदर्भातील संदेश आणि व्यवहाराचे संदेश आले. त्यानंतर त्यांच्या ICICI बँक खात्यातून Axis Bank खात्यावर एकूण 9 लाख 99 हजार 971 रुपये ऑनलाइन हस्तांतरित झाल्याचे समोर आले.
या प्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.