हज यात्रेच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक; एकाला अटक

हज यात्रेच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक; एकाला अटक

काळेवाडी | ८ ऑक्टोबर २०२६ : हज यात्रेसाठी मक्का-मदिना येथे पाठवण्याचे आश्वासन देऊन एका व्यक्तीकडून ११ लाख रुपये घेतल्याचा आणि त्यानंतर यात्रा आयोजित न करता पैसेही परत न केल्याचा प्रकार काळेवाडी परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंट आणि प्रोप्रायटरविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका ६० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.  त्यानुसार कंपनीचा एजंट रियाज शेख (रा. नढे नगर, काळेवाडी, पुणे ) आणि कंपनीचा प्रोप्रायटर अमीर सरदार शेख (रा. चूडामन तालीम, भवानी पेठ, पुणे ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील रियाज शेख याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काळेवाडीतील जामा मस्जिद परिसरात असलेल्या अल-खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयाशी संबंधित हा प्रकार घडला.

आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना आणि त्यांचे वडील अमीर शेख यांना हज यात्रेसाठी मक्का-मदिना येथे पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी फिर्यादीकडून एकूण ११ लाख रुपये कंपनीच्या एचडीएफसी बँक खात्यावर जमा करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मात्र, पैसे स्वीकारल्यानंतरही आरोपींनी फिर्यादींना हज यात्रेसाठी पाठवले नाही. तसेच घेतलेली रक्कम परत न करता टाळाटाळ करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३(५) तसेच भावदि कलम ४०६, ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories