तळेगाव दाभाडे | २५ सप्टेंबर २०२६ : एसबीआय बँकेचे बाकी असलेले लोन भरण्यासाठी गुगलवरून मिळालेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधणे सीआरपीएफच्या ५७ वर्षीय अधिकाऱ्याला महागात पडले. समोरील व्यक्तीने एसबीआय बँकेचा मॅनेजर असल्याचे भासवून व्हॉट्सॲपवर फॉर्म पाठवला. तो भरून घेतल्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलचा ताबा घेत त्यांच्या बँक खात्यातून एकूण 15 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशकुमार प्रेमचंद शर्मा (वय 57, रा. सध्या सीआरपीएफ कॅम्प, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे; मूळ रा. कासाबाद, दुडू, जि. बागपत, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 23 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास सीआरपीएफ कॅम्प येथील कार्यालयात घडली.
फिर्यादी एसबीआय बँकेचे बाकी असलेले लोन भरण्यासाठी गुगलवरून एसबीआय बँकेचा मोबाईल नंबर मिळवून त्यावर फोन करत होते. त्यावेळी आरोपीने आपण एसबीआय बँकेचा मॅनेजर असल्याचे भासवले. त्याने फिर्यादीच्या व्हॉट्सॲपवर एक फॉर्म पाठवून तो भरून सबमिट करण्यास तसेच लोन भरल्याचे सर्टिफिकेट पाठवतो, असे सांगितले.
आरोपीने पाठवलेली फाइल फिर्यादीने उघडून फॉर्म भरल्यानंतर आरोपीने फसवणूक करून त्यांच्या मोबाईलचा ताबा घेतला. त्यानंतर फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून 5 लाख, 3 लाख ८९ हजार आणि 6 लाख , अशा तीन व्यवहारांमधून एकूण 14 लाख ८९ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमांनुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.