भोसरीत गोल्ड लोन ऑफिसरवर फसवणुकीचा गुन्हा!

भोसरीत गोल्ड लोन ऑफिसरवर फसवणुकीचा गुन्हा!

भोसरी | २५ सप्टेंबर २०२६ : गोल्ड लोनच्या ग्राहकांकडून कर्ज खाते बंद करण्यासाठी रोख स्वरूपात स्वीकारलेली रक्कम कंपनीकडे जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार भोसरीत समोर आला आहे. या प्रकारामुळे कंपनीचे ३५ लाख ७७ हजार १३५ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कंपनीच्या तत्कालीन गोल्ड लोन ऑफिसरविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग संजय गायकवाड (वय ३०, कामोठे, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अक्षय धर्मराज महामुलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी हा उन्नती फिनसर्व्ह प्रा. लि., भोसरी शाखेत गोल्ड लोन ऑफिसर या पदावर कार्यरत होता. ४ मे २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गोल्ड लोन घेणाऱ्या संबंधित ग्राहकांकडून त्यांची कर्ज खाती बंद करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम आरोपीने रोख स्वरूपात स्वीकारली.

मात्र, ग्राहकांकडून स्वीकारलेली रक्कम कंपनीकडे जमा करणे आवश्यक असतानाही आरोपीने ती जमा केली नाही. त्याऐवजी या रकमेचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून ग्राहकांच्या व्यवहारामध्ये कंपनीचे ३५ लाख ७७ हजार १३५ रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

कंपनीत नोकरी करत असताना आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीचा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक टापरे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories