चाकण | २५ सप्टेंबर २०२६ : चाकणमधील पृथ्वीप्रस्थ बिल्डिंग परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून मारहाण झाल्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. एका बाजूने ७० वर्षीय महिलेला लोखंडी पाईपने मारहाण केल्यासह तिच्या दोन मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूने ३४ वर्षीय महिला आणि तिच्या पतीला काठी, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात एका ७० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २३ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास पृथ्वीप्रस्थ बिल्डिंग, शिवाजी शाळेसमोर, चाकण येथे त्या घराबाहेर असताना सुजित देवरे याने लोखंडी पाईपने मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या रुद्र परदेशी, आदित्य धनवटे आणि अंदाजे २५ वर्षीय एका अनोळखी व्यक्तीने मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच महिलेची मुले संदीप बोराटे आणि संतोष बोराटे यांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद आहे.
याच घटनेच्या अनुषंगाने दुसऱ्या बाजूने एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पृथ्वीप्रस्थ बिल्डिंग, मार्केट यार्ड परिसरात त्या पतीसह घरासमोर असताना ‘तुम्ही देवरे भावजीवाल्याची बाजू घेता’ असे म्हणत वाद घालण्यात आला. त्यानंतर संतोष बोराटे, संदीप बोराटे आणि एका महिलेने संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या पतीला काठी, हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या पतीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे नमूद आहे.
दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याच्या तक्रारी दिल्याने उत्तर चाकण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वादाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि घटनेत कोणाची काय भूमिका होती, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.