भोसरीत गॅरेजमध्ये बसला आग; एक जळून खाक, पाच बंबांची धावपळ

भोसरीत गॅरेजमध्ये बसला आग; एक जळून खाक, पाच बंबांची धावपळ

पिंपरी-चिंचवड : भोसरीतील गवळी पार्किंगजवळ दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसला बुधवारी सायंकाळी अचानक आग लागली. आगीमुळे एक बस पूर्णपणे जळून खाक झाली, तर बाजूला उभ्या असलेल्या अन्य दोन बसमधील सीट, कुशन आणि पडद्यांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅरेजमध्ये तीन ट्रॅव्हल्स बस दुरुस्तीसाठी उभ्या होत्या. याचवेळी एका बसमध्ये आग लागली. बसमध्ये असलेल्या सीट, कुशन आणि पडद्यांमुळे आग वेगाने पसरली. काही वेळातच धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.


एका बसला लागलेली आग इतकी भडकली की ती बस संपूर्ण जळून खाक झाली. आगीची झळ शेजारी उभ्या असलेल्या अन्य दोन बसांनाही बसली. त्या बसांमधील आतील साहित्य जळाले असून, नुकसानीचा नेमका पंचनामा करण्यात येत आहे.


घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांसह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. वल्लभनगर, भोसरी, चोवीसावाडी, मोशी आणि चिखली या अग्निशमन केंद्रांमधून एकूण 5 अग्निशमन बंब पाठवण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग इतर वाहनांपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न केले. जवळपास दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. आग विझविल्यानंतर बसमध्ये पुन्हा जळणारी वस्तू शिल्लक राहू नये यासाठी शीतकरणाचे कामही करण्यात आले.

आग पाहण्यासाठी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, भोसरी पोलिसांनी गर्दी हटवून अग्निशमन दलाच्या कामात अडथळा येणार नाही याची काळजी घेतली. गॅरेजमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना आग कशी लागली, याचा तपास केला जात आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्युत बिघाड, दुरुस्तीच्या कामादरम्यान निर्माण झालेली ठिणगी किंवा अन्य कारणामुळे आग लागली का, याबाबत संबंधित यंत्रणा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories