रावेत | २९ सप्टेंबर २०२६ : डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या कामातून झालेल्या आर्थिक वादातून आर्किटेक्टला मारहाण करून त्याच्याकडून बँकेचे कोरे चेक जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार रावेत येथे घडला. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एक आरोपी ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज नाथाजी पाटील (वय ३१, रा. रावेत, मूळ रा. पो. पिंपळे, ता. पन्हाळा) यांनी फिर्याद दिली आहे. ते व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत.
या प्रकरणी शिवाकांत तिवारी (रा. किवळे, ता. हवेली, जि. पुणे), मुस्सा गौस शेख (रा. देहूरोड बाजार, देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे) आणि शिवाकांत तिवारी यांचा चालक अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुस्सा गौस शेखला ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि जागामालक यांच्यात किवळे येथील जागा विकसित करण्याबाबत संमती झाली होती. त्यानुसार बांधकाम परवाना काढण्याचे काम फिर्यादीच्या माध्यमातून सुरू होते. या कामासाठी आरोपींपैकी एकाने काही रक्कम आगाऊ दिली होती. मात्र काही कारणांमुळे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करण्यास विलंब होत असल्याने यापूर्वी दमदाटी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
२९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला रावेत येथील एका रेस्टॉरंटजवळ बोलावण्यात आले. तेथे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करण्यास विलंब का होत आहे, अशी विचारणा करून आरोपींनी संगनमताने फिर्यादीला त्यांच्या टोयोटा हाय रायडर (UP 32 QS 0030) या गाडीत जबरदस्तीने बसवले. त्यानंतर मारहाण व दमदाटी करून फिर्यादीकडून एचडीएफसी बँकेचे कोरे चेक सही करून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादीला पुण्यातील विश्रांतवाडी येथे सोडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.