'पीएमपी' बसथांब्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात आता फौजदारी गुन्हे दाखल होणार
पुणे, ता. २२ - अनेक जाहिराती व बॅनर्स चिकटवून 'पीएमपीएमएल'च्या बसथांब्यांच्या विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश 'पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी वाणिज्य विभागाचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक, १७ आगार व्यवस्थापक व अभियंत्यांना दिले आहेत. 'पीएमपी'च्या वाहतूक निरीक्षकांकडून विविध पोलिस ठाण्यांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याबाबत, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी पत्रव्यवहार सुरु आहे.
'पीएमपी'च्या बसथांब्यांवर जाहिरातींचे बॅनर्स, पोस्टर्स लावली जातात त्यामुळे बस थांबे खराब दिसतात. याबाबत सूचना देऊनही जाहिराती लावणे थांबत नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने याविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बसथांब्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, सहव्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे यांनी पीएमपी प्रशासनाला दिले आहेत. वाणिज्य विभागाच्या मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या पत्रानंतर सर्व आगार व्यवस्थापक तसेच डेपो अभियंत्यांकडून बस थांब्यांची साफसफाई व विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पीएमपीच्या वाहतूक निरीक्षकांकडून विविध पोलिस ठाण्यांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
'पीएमपीएमएल'च्या अंतर्गत एकूण १२३० शेड आहेत, कोथरूड, स्वारगेट, न. ता. वाडी, कात्रज, हडपसर, अप्पर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, पिंपरी, भेकराईनगर, शेवाळवाडी, बालेवाडी, बाणेर, वाघोली, चर्होली, हिंजवडी डेपोअंतर्गत उभारलेल्या सर्वच थांब्यांवर होर्डिंग्ज आहेत.
जाहिरातींचे फलक लावणाऱ्यांवर थेट कारवाईसाठी, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट १९९५ व प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्ट १९९४ अन्वये, तसेच मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम २ (डीबी) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यासाठी पीएमपी प्रशासनाचा पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम व पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे पत्रव्यवहार सुरु केला आहे, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.