चारचाकी वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका, तीनपट शुल्क भरुन मिळणार पसंतीचे क्रमांक
चारचाकी वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची 'एनएच' नवीन मालिका, तीनपट शुल्क भरुन मिळणार पसंतीचे क्रमांक
पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाची घोषणा, बुधवारी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत करता येईल अर्ज
पिंपरी, ता. २१ - पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये दुचाकी वाहनांसाठी‘एनएच’ही नवीन मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. चारचाकी वाहनधारकांना या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक तीनपट शुल्क भरुन दिले जाणार आहेत. ज्या चारचाकी मालकांना आपल्या आवडीचे क्रमांक हवे आहेत त्यांनी बुधवारी (ता. २२) सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
भरलेला अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, छायाचित्र असलेले ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करायचा आहे. डिमांड ड्राफ्ट ‘डी.वाय.आर.टी.ओ., पिंपरी चिंचवड’या नावे पुण्यातील राष्ट्रीयकृत बँकेचा असला पाहिजे.
चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी २३ एप्रिल रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास २३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधीत अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. आकर्षक क्रमांकाचे शुल्कामध्ये बदल झाल्यास त्याप्रमाणे विहीत केलेले शुल्क लागू करण्यात येणार आहे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा संपर्क -
- 020-27492828