गोवंशाची तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का दाखल होणार, गो रक्षणासाठी राज्यसरकारच्या विविध उपाययोजना
गोवंशाची तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का दाखल होणार, गो रक्षणासाठी राज्यसरकारच्या विविध उपाययोजना
पुणे, ता. २२ - महाराष्ट्र सरकारने गो तस्करी, गो वंशांची बेकायदेशीर वाहतूक आणि अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. गोवंशाच्या संघटित तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळ्या आणि रॅकेट्सविरुद्ध आता थेट 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत' (MCOCA)गुन्हे दाखल केले जाणार आहेत, याबाबतचा आदेश गृह विभागाने जारी केला आहे. गो तस्करी, जनावरांची बेकायदेशीर वाहतूक किंवा अनधिकृत कत्तलखान्यांबाबत '११२' या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधित पोलीस विभागाने त्वरित कारवाई करणे बंधनकारक असणार आहे.
गृहविभागाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या अधिकारकक्षेत कार्यरत असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यांची तपासणी करण्याचे आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात कोठेही अनधिकृत कत्तलखाने कार्यरत राहणार नाहीत, याची खात्री करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.
गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करताना आढळणाऱ्या वाहनांवर 'मोटार वाहन कायद्या'तील तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश सरकारने परिवहन विभागाला दिले आहेत. पोलिस, पशुसंवर्धन आणि परिवहन विभागांमध्ये समर्पित 'नोडल अधिकारी' (समन्वयक अधिकारी) नियुक्त करण्याचे आणि त्यांचे संपर्क क्रमांक सर्वसामान्य जनतेसाठी सार्वजनिकरीत्या उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, सीमेवरील जिल्ह्यांमध्ये संयुक्त तपासणी नाके उभारले जाणार आहे. गो तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या संभाव्य मार्गावर विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. गो रक्षणाची ही जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांवर असणार आहे. सोपवण्यात आली आहे.