चाकण-हिंजवडीतील वाहतूक आणि रस्त्यांच्या कामांचा जिल्हाधिकारी डुडींकडून आढावा

चाकण-हिंजवडीतील वाहतूक आणि रस्त्यांच्या कामांचा जिल्हाधिकारी डुडींकडून आढावा

पुणे : चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पर्जन्य जलनिस्सारण, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण, जंक्शन व यु-टर्नचे नियोजन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीच्या माध्यमातून आढावा घेतला. प्रलंबित सर्वेक्षण आणि नियोजनाची प्रक्रिया पूर्ण करून कामांसाठी आवश्यक तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह एमआयडीसी, महापालिका, पोलीस, महामार्ग आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चाकणमधील नाल्यांचे सर्वेक्षण करून हंगामी अतिक्रमणे तातडीने हटवावीत तसेच अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करून नाले मोकळे करावेत, असे निर्देश डुडी यांनी दिले. परवानगी घेऊन झालेल्या बांधकामांमुळे अडथळे निर्माण होत असल्यास पर्यायी मार्गाने नाला वळविण्यासाठी जागेचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. एमआयडीसी आणि पीएमआरडीएला त्यांच्या कार्यक्षेत्रातील नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक, यु-टर्न आणि जंक्शनसाठी ट्रॅफिक डेटा व ट्रॅफिक सिम्युलेशनचा अभ्यास करून आवश्यक ठिकाणीच अधिकृत यु-टर्न आणि जंक्शनचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चाकण आणि हिंजवडीतील खड्डे दुरुस्त करण्याबरोबरच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी प्रभावी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारण्यावरही भर देण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व्हिस रोडवर अनधिकृत बसथांबे व पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले. बस आणि इतर वाहने केवळ अधिकृत बसथांबे व नियोजित बस डेपोवर थांबतील, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, गणेशोत्सवामुळे स्थगित करण्यात आलेली अतिक्रमणविरोधी कारवाई तातडीने पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories